- चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या घरे बांधणीस आता क्षेत्रीय अधिकारी देणार परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- शहरात चार हजार चौरस मीटरपर्यंतची घरे बांधण्याची परवानगी आता महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी देणार आहेत. तर, चार हजार चौरस मीटर पुढील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना दिले आहेत.
बांधकाम विभागाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी काढले. महापालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेच्या तांत्रिक विभागाकडे होते. उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहशहर अभियंता आणि शहर अभियंता यांना परवानगीचे अधिकार विभागून दिले जात होते.
सध्या उपअभियंत्यांकडे दोन हजार चौरस मीटरपर्यंत परवानगीचे अधिकार होते . चार हजार चौरस मीटर पुढील बांधकामांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार सहशहर अभियंत्यांकडे होते. तसेच अनधिकृत बांधकामे पाडणे, अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत. महापालिकेत आठ क्षेत्रीय कार्यालये असून पहिल्यांदाच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार मिळाले आहेत.
महापालिका चार प्रभागांचा एक असे दोन परिमंडळ करणार आहे. चार ते वीस हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकार उपायुक्तांना असणार आहेत. तर, ३० हजार चौरस मीटर पुढील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना असणार आहेत. परिमंडळ कार्यान्वित होत नाही तोपर्यंत २० हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकारही अतिरिक्त आयुक्तांकडेच असणार आहेत. अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी बांधकाम चालू करण्याचा दाखला देणे, जोते तपासणी, बांधकाम परवानगी मुदतवाढ व ना हरकत दाखला देणे, भोगवटापत्रक देणे इत्यादी विषयक कामकाज तसेच घर दुरुस्ती परवानगी देणे इत्यादी प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार असणार आहेत.












