- दुचाकीस्वारांसह आता दुकानदारांवर वाहतूक पोलिसांकडून होणार कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- वाहनांमध्ये विनापरवाना बदल करणे कायद्याने गुन्हा आहे. फॅन्सी नंबर प्लेटमुळे पोलिसांना कारवाई करताना अनेक अडचणी येतात. तसेच सायलन्सर बदलल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता अशा दुचाकीस्वारांसह आता दुकानदारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होणार आहे.
वाहन मोटार अधिनियम १९८८ चे कलम ५२ नुसार वाहनांमध्ये विनापरवानगी फेरबदल करणे, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम ५०-५१ अन्वये वाहनाची नंबर प्लेट बदलणे गुन्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
बनावट नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून गुन्हेगार त्यांचा गुन्हयांमध्ये वापर करतात, त्यामुळे अशी वाहने व आरोपी तत्काळ मिळून येत नाहीत, दुचाकी वाहनांच्या सायलन्सरमध्ये ( विशेषतः बुलेट सायलेन्सर ) बदल करून सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांसारखा आवाज करून नागरिकांचे स्वास्थ्य बिघडवले जाते. यामुळे वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन केले जाते. शहरातील वाहनचालक वाहनामध्ये विनापरवाना फेरबदल करीत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत.












