विषय :- कोरोनाच्या अनुषंगाने दिवाळीत फटाके विक्रेत्यांना स्टॉलसाठी परवानगी नकोच…
पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा कमी होताना दिसत असला तरी, थंडीत कोरोनाची लाट उसळण्याची दाट शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंतच्या सणउत्सवांवर बरेच निर्बंध होते. मात्र आता दिवाळी ‘धुमधडाक्यात’ साजरी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून रक्षाबंधन आणि अन्य सणांच्यावेळी शहरात स्टॉलला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, महापालिका प्रशासन फटाके विक्रेत्यांना स्टॉल सुरू करण्यास परवानगी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा परिणाम पशुपक्ष्यांवर होतो, हे माहिती असूनसुद्धा दिवाळीच्या आनंदात फटाके फोडताना मर्यादेचे भान ठेवले जात नाही. परंतु, आता फटाक्याच्या धुरामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या व कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णांच्या फुफुसावर या धुराचा परिणाम होणार असल्याचे भाकीत तज्ञांनी वर्तविले आहे.
दिवाळीच्या दिवसात ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा सुमारे ४५ ते ५० टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे कोरोना रुग्णांना त्याचा त्रास उदभवू शकतो. आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन, दिवाळीत फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीस परवानगी देऊ नये, अन्यथा पुन्हा कोरोना विषाणू डोके वर काढल्याशिवाय राहणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्त या नात्याने आपली असेल, याची नोंद घ्यावी.
——————–