- चिंचवड विधानसभेच्या नगरसेवकांकडून स्थायीत जोरदार ऱ्हाडेबाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. पालिका पदाधिकांऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. आचारसंहितेत स्थायी सभेचे कामकाज करता येत नाही, असे स्पष्ट असताना देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी सभा घ्या असा अट्टहास करीत सभा घ्यायला लावली.
सभागृहात अध्यक्ष संतोष लोंढे, भाजपचे अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम आणि अभिषेक बारणे हे चारच सदस्य उपस्थित होते. बरेच सदस्य ऑनलाईनवर गैरहजर होते. आयुक्त हर्डीकर शासकीय कामानिमित्त मुंबईला गेल्याने त्यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त अजित पवार प्रमुख म्हणून उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त सुभाष इंगळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, कार्यकारी अभियंता देवन्न गट्टूवार, संजय घुबे, उपस्थित होते.
सभा कामकाजात उपस्थितांचे स्वागत करुन अध्यक्षांनी शुक्रवारपर्यंत सभा तहकूब केली. ते सभागृहातून बाहेर पडले. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी अजित पवार यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सभा तहकूब होण्याचा निरोप आम्हाला अगोदर का सांगितला नाही, असा आक्षेप घेतला. आयुक्त का गैरहजर आहेत. आम्ही त्यांचा निषेध करायचा का, असे सुनावले. तसेच एका नगरसेवकाने ग्लास फोडला तर दुसऱ्याने फाईल भिरकावली, माईकची तोडफोड केली. थोडक्यात काय तर चिंचवड विरूद्ध भोसरी विधानसभा असा सामना आज पहावयास मिळाला.