- पुणे पदवीधर निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहराचा असणार सिंहाचा वाटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या पिंपरी – चिंचवड शहर जिल्हा भाजपने शहरातील १८ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. विशेष म्हणजे प्रदेश भाजपने पिंपरी – चिंचवड भाजपला १५ हजार पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे उद्दीष्ट दिले होते. त्यापेक्षा अधिकच्या ३ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करून पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमची भूमिका निर्णायक असेल, हे पिंपरी-चिंचवड भाजपने स्पष्ट केले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे काम सुरू केले होते. पिंपरी – चिंचवड भाजपला शहरातील १५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार भाजपने पिंपरी – चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर मतदार नोंदणीचा कार्यक्रम आखून काम केले.
पिंपरी – चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा अशा ३२ प्रभागांमध्ये सभा, प्रभाग सभा, बैठका व वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून नगरसेवक व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्षत संपर्क साधला. ऑफलाईनव ऑनलाईन नोंदणी केली. आजपर्यंत १८ हजार जणांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.