बेकायदेशीर गतिरोधक उभारणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- चुकीचे, जीवघेणे, धोकादायक, आयआरसीची लांबी, रुंदी, उंची, स्लोप याबाबतचे निकष धूडकावत उभारलेल्या स्पीडब्रेकर्समुळे असंख्य मृत्यू व गंभीर दुखापती होत आहेत. असे गतिरोधक उभारणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचे (Attempt to Murder) गुन्हे IPC 304(A) खाली दाखल करावेत, अशी मागणी पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे कित्येक दिवसांपासून होत आहे. परंतु, गेंड्याच्या कातडीचे प्रशासन व पोलीस काहीही कारवाई करीत नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोरच गुरुवारी बीआरटी मार्गात चुकीच्या गतिरोधकामुळे अंदाज न आल्याने दुचाकी घसरून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? पिंपरीत अमित वाघेरे नावाचा तरुण काही महिने स्पीडब्रेकरवरुन उडून कोमात गेला होता व कोट्यावधी रु. खर्च करुनही वाचला नाही. पालिकेला त्याच्या कुटुंबियाना ५ लाख रु. द्यावे लागले, अशी अनेक उदाहरणे आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोरील बीआरटी मार्गात नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी टेबल गतिरोधक उभारण्यात आला आहे. या गतिरोधकाची उंची नियमाप्रमाणे नसल्याने या ठिकाणी वाहने आदळतात. बेकायदेशीर व धोकादायक गतिरोधक दुरुस्त करण्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी गरज नसताना भारतीय रोड कॉंग्रेसचे सर्व निकष धुडकावून लावत कोठेही, मध्ये किमान अंतर न ठेवता, अर्ध्या किलोमिटरमध्ये ३-४ गतिरोधक, ४५ अंशाच्या कोनात स्लोप न ठेवणे, अतिशय चढा स्लोप ठेवणे इ. असे अनेक प्रकार चालू आहेत.
बेकायदेशीर गतिरोधकांमुळे पाठीच्या मणक्यांचे आजार, गाडीच्या शॉक ॲब्सॉबरवरती परिणाम, वारंवार होणारे छोटे मोठे गंभीर अपघात, वेळप्रसंगी होणारे मृत्यू हे सर्व नागरिकांना भोगावे लागते. गेल्या काही वर्षांत असंख्य लोक अश्या धोकादायक व बेकायदेशीर गतिरोधकांमुळे गंभीर जखमी झाली आहेत व काहींनी आपला जीवही गमावला आहे. परंतु, तरीही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन काही करत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी केला आहे.