न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२०) :- यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविडविषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने हात धुवावेत. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाग्रस्त रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालिका क्षेत्रात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा. दिपावली हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे.
पालिकेच्या मालकीच्या ठिकाणी उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे, शाळा इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. सॅनिटायझर ज्वलनशिल असल्याने दिवे लावताना फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापरा टाळावा. दिवाळीत हात धुताना सॅनिटायझरऐवजी साबण, हॅण्डवॉशचा वापर करावा.
या काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रमांना परवानगी नसेल. ऑनलाईन पद्धतीने आयोजन करता येईल. खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी, कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे. योग्य ती खबरदारी घ्यावी. नियमांबाबत सहाय्यक आयुक्त, जनसंपर्क विभाग यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करावी. नियम भंग करणारे, मास्कविना फिरणारे, गर्दी करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी.
कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील. सदर आदेश दि. १०
नोव्हेंबर २०२० पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लागू राहतील.