- शहरातील सुमारे दीड लाख बांधकामांवर टांगती तलवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- मुंबई उच्च न्यायालयाने निगडी सेक्टर क्रमांक २२ येथील रेड झोनची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरभूमापन विभागाने मोजणी पूर्ण करून नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. नव्या नकाशानुसार रेड झोन हद्दीत पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे दीड लाख बांधकामे येत आहेत.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रेड झोनसंदर्भात नकाशा तयार करण्याचे आदेश दिले होते. देहूरोड लष्कर डेपोच्या सीमाभितीपासून २ हजार यार्डपर्यंत असलेला हा नकाशा पालिकेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आला आहे. नव्या नकाशामुळे रेड झोनमध्ये असलेली बांधकामे व घरांची संख्या निश्चित झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा नकाशा न्यायालयात सादर केला आहे. त्यावर न्यायालय काय भूमिका घेते यावर बाधित बांधकामांचे भवितव्य अंवलबून आहे. त्यामुळे रहिवाशावर कारवाईची टांगती तलवार आहे.
रेड झोनमध्ये येत असलेला भाग…
तळवडेगाव, त्रिवेणीनगर, रूपीनगर, प्राधिकरण सेक्टर क्रमांक २२, ओटा स्कीम, आंबेडकरनगर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, यमुनानगरचा काही भाग, चिखली, म्हेत्रेवस्ती, जोतिबानगर, पीसीएमसी वसाहत.