न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- नुकत्याच रस्त्यावरील अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ३८ वर्षीय रिक्षा चालकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारां दरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते.
त्यानंतर मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले व रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटूंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे हृदय, स्वादुपिंड, यकृत, नेत्रपटल, दोन मूत्रपिंड हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोचविण्यात आले. यामध्ये एक मूत्रपिंड आणि यकृत हे डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांचे प्रत्यारोपण पुण्यातील इतर रुग्णालयात करण्यात आले.