न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- करोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने साडेसात महिन्यांपेक्षा अधिक काळ नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे नाटकांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले. राज्य सरकारने ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के आसन क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, अद्यापही नाटकांची गाडी रूळावर आलेली नाही. त्यामुळे शहरातील नाट्यगृहांचे भाडे कमी करण्यासाठी सिने आणि नाट्य अभिनेता प्रशांत दामले यांच्यासह कलाकारांनी शुक्रवारी (दि. २७) आयुक्त आणि महापौर यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.
करोनामुळे १४ मार्चपासून नाट्यगृहे बंद करण्यात आली होती. ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर नाटकांच्या प्रयोगासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘ बुकींग’ही सुरू झाले. मात्र, नाटकांच्या प्रयोगासाठी असलेली ५० टके आसन आसनक्षमतेचीच परवानगी लक्षात घेता नाट्य व्यवस्थापक, नाट्य कलाकार यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहांच्या भाड्यात ५० टक्के सवलत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, संयोजन आणि नाट्य व्यवस्थापकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा ढोरे यांची भेट घेतली.
सिनेअभिनेते नाट्यकर्मी प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली मोहन कुलकर्णी, समीर हंपी, प्रवीण बर्वे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, प्रविण तुपे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, आण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.