न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- करोना संसर्गाचा धोका कायम असला तरीही शहरातील रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी सर्मपित केलेले वायसीएममधील रुबी एलकेअर सर्व्हिसेस हृदयरोग उपचार केंद्र पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले आहे. या केंद्रात महापालिकेने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात उपचार करण्यात येत असून हृदयविकार असलेल्या रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप कनोज यांनी केले आहे.
शहरात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण वायसीएम रूग्णालयासह रूबी एलकेअर हृदयरोग केंद्र करोना सर्मपित केले होते. त्यामुळे येथे फक्त करोना रूग्णांवर उपचार केले जात होते. तब्बल आठ महिने करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्यस्थितीत शहरातील करोनाबाधित रूग्ण संख्या घटल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खासगी हॉस्पिटलमधील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला.
तसेच महापालिकेचे वायसीएम रुग्णालय देखील ५० टक्के नॉनकोविड करून रूबी एलकेअर हदयरोग केंद्र देखील नॉन कोविड करण्यात आले. त्यामुळे वायसीएम रूग्णालयात बाह्यरुग्ण ते कक्ष सुरु केल्यानंतर रुबी अलकेअर केंद्रात हृदयविकार रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले. रुबी एलकेअर केंद्रात २ सीडी इको, स्ट्रेस टेस्ट (टीएमटी) पासून अँजिओग्राफी (सी.ए.जी.) पर्यंतच्या सर्व तपासण्या केल्या जातात. तसेच, पेसमेकरपासून अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरीपर्यंतचे सर्व उपचार या केंद्रात होतात.


















