- पदवीधर उमेदवार अरुण लाड विजयी तर, शिक्षकचे प्रा. आसगावकर विजयाच्या वाटेवर….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे.
पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे.
पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे.
तसेच पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीची १६ हजार ८७४ मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी विजयाकडे आगेकूच केली होती. पहिल्या फेरीची मतमोजणी रात्री बाराच्या सुमारास संपली. त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु झाली.