- शासनाच्या महसूल वाढीसाठी गृह विभागाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिलेल्या आदेशामुळे बंद झालेल्या हायवेवरील दारू दुकानांपैकी तब्बल १ हजार ५०० दुकाने आता पुन्हा सुरू होणार आहेत. शासनाच्या महसूल वाढीसाठी गृह विभागाने नियमांत आणलेल्या शिथिलतेमुळे महापालिका क्षेत्रातील ५ किलोमीटर परिसरात असलेली ही दारू दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत.
या आधी हायवेच्या ५०० मीटर परिसरात दारू विक्रीस बंदी घालणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहन अधिक दारू दुकाने बंद झाली होती. मात्र शासनाने नियमांत आणलेल्या शिथिलतेमुळे बंद झालेल्या दुकानांपैकी सुमारे ४० टक्के दुकानांचे शटर उघडणार आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार, हायवेच्या ५०० मीटर परिसरात बंदी असलेला आदेश महानगरपालिका क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिसरात आणि नगरपरिषदेच्या ३ किलोमीटर परिसरात लागू होणार नाही. त्यामुळे महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतून गेलेल्या हायवेवर दारू दुकाने पुन्हा सुरू करता येतील.
महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणन याआधीच शासनाने महापालिका आणि नगरपरिषदेतून जाणाऱ्या हायवेंना स्थानिक रस्त्यांचा दर्जा दिला होता. त्यानंतर शासनाने जारी केलेल्या आदेशात महापालिका क्षेत्राच्या ३ किलोमीटर, तर नगरपरिषद क्षेत्राच्या १ किलोमीटर परिसरातील रस्त्यांवर मद्य विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. शासनाने नव्याने जारी केलेल्या आदेशात महापालिका क्षेत्रातील मर्यादा ३ किलोमीटरहून ५ किलोमीटरपर्यंत, तर नगरपरिषदेतील रस्त्यांची मर्यादा १ किलोमीटरहून ३ किलोमीटरपर्यंत वाढवली आहे.