- पिं. चिं. शहरातील उपनगरात रुपीनगर वगळता बंदला संमिश्र प्रतिसाद..
- विभागप्रमुख नितिन बोंडे व रुपीनगर शिवसेनेच्या प्रयत्नांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांनी नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात अनेक बैठकी झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज मंगळवारी (दि. ८) रोजी देशभरात ‘भारत बंद’ची हाक दिली. कृषी कायद्यांच्या विरोधात ‘भारत बंद’ ला अवघ्या देशातून चांगला प्रतिसाद मिळत असताना, रुपीनगर वगळता पिंपरी-चिंचवड शहरातील इतर उपनगरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रुपीनगर परिसरात शिवसैनिकांनी एकत्रित येवून व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले. परिसरातील नागरिकांनीदेखील या बंदमध्ये सहभागी होत, १०० टक्के बंद पाळून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा अनोखा संदेश दिला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार उपनेते व संपर्कप्रमुख माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली रुपीनगर शिवसेना विभागप्रमुख नितिन बोंडे व शिवसैनिकांनी हा बंद यशस्वी केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय भालेकर, शिवसेना समन्वयक दादा नरळे, शाखाप्रमुख सहदेव चव्हाण, शाखाप्रमुख प्रविण पाटील, युवासेना चिटणीस अमित शिंदे, उपविधानसभा सुनिल समगीर, उपविभाग प्रमुख अभिजित गिरी, जेष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे, अरुण थोपटे, पांडुरंग कदम, अभिमन्यु सोनसळे, दत्तात्रय ढोले, संतोष पवार, सचिन गारगोटे, राहुल पिंगळे, अशोक भोपळे, सतीश कंठाळे, गणेश भिंगारे, नागेश आजुरे, सौरभ मोरे, तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिकांनी बंद मध्ये सामील होऊन आपापल्य विभागातील दुकानदार, व्यापारी, वाहनचालक व नागरिकांना शांततेने बंदचे आवाहन केले.
शिवसेना विभागप्रमुख नितिन बोंडे म्हणाले, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांवरून मोठा वाद निर्माण झाला असून या विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. विविध राज्यांतून दिल्लीकडे निघालेले शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश मिळत नसल्याने सीमांवर ठिय्या मांडला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नसल्याने आज मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यात शिवसेना व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’लाही महाविकास आघाडीने समर्थन दिलं आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकतेसोबत उभे राहणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य आहे. या ठिकाणी कोणतेही राजकरण नाही. शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे. व्यापाऱ्यांची जी मक्तेदारी आहे ती मोडित काढली पाहिजे, अशी शिवसेनेची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.
”आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाची दखल घेऊन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या प्रयत्नामुळे रुपीनगर परिसरातील किराणा दुकाने, हॉटेल्स व इतर सर्वच आस्थापन व नागरिक या बंदमध्ये सक्रीय सहभागी झाले होते. या सर्वांनी कडकडीत ‘भारत बंद’ मध्ये सहभाग नोंदवत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा अनोखा संदेश दिला आहे.
– नितिन बोंडे (रुपीनगर शिवसेना विभागप्रमुख)”















