- ठेकेदारांना सात दिवसाची मुदत अन्यथा पालिकेकडून कडक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागात परफोमेन्स सिक्युरीटी डिपॉझिट ( पीएसडी ) म्हणून जमा केलेले फिक्स डिपॉझिट रिसीट ( एफडीआर ) बोगस व बनावट असल्याचे आढळून आले आहेत. याप्रकरणी पालिका प्रशासनाने सोमवार (दि. ७) अखेरपर्यंत तब्बल १९ ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
पालिकेच्या विविध विभागात ठेकेदारांच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली आहे. त्यात सर्वात कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांची संख्या वाढली आहे. कमी दराने काम करत असताना एफडीआर पालिकेकडे जमा करावा लागतो. मात्र, काही ठेकेदारांनी बोगस व बनावट एफडीआर जमा केल्याची तक्रार शिवसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने विभागनिहाय चौकशी सुरू केली आहे.
स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनिस्सारण, आरोग्य, पर्यावरणासह अन्य विभागात चौकशी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली. विभागनिहाय तपासणीची आकडेवारी बैठकीत मांडण्यात आली. स्थापत्य विभागात बोगस एफडीआर जमा करणारे ठेकेदार आतापर्यंत आढळून आले आहेत. त्या ठेकेदारांच्या प्रत्येक कामांची चौकशी केली जात आहे. त्या सर्वांना स्थापत्य विभागाने नोटीस बजावून ७ दिवसात खुलासा मागविला आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खुलासा असमाधानकारक वाटल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.