न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी सभा मंगळवार (दि. ११) रोजी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडली. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. दापोडीपासून पिंपरी पर्यंतच्या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. हाच मेट्रो मार्ग पिंपरी महापालिका भवनापासून भक्ती-शक्ती निगडीपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिली आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर संबंधित अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर तो राज्य सरकारकडे व राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार आहे.
पिंपरी ते निगडीदरम्यानची मेट्रो स्थानके, मार्गाची लांबी, संबंधित प्रकल्पाच्या कामाची पद्धती नमूद केली आहे. संबंधित मेट्रो मार्ग उभारणीसाठी भूसंपादन करणे व मार्गाला अडथळा ठरणाऱ्या सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे एक हजार ४८ कोटी २२ लाख रुपये खर्चास स्थायीने आज मान्यता दिली आहे.
दरम्यान, पिंपरी महापालिका भवन ते निगडीपर्यंतचा मेट्रो मार्ग ४.४१३ किलोमीटर लांबीचा असेल. त्यावर तीन स्थानके प्रस्तावित असून, त्यात चिंचवड स्टेशन, आकुर्डी व निगडी यांचा समावेश आहे.