- कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले – इरफानभाई सय्यद..
- माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- गेल्या १५ वर्षांपासूनचा प्रलंबित कामगार संघटनांचा प्रश्न ठाकरे सरकारने मार्गी लावला असून, राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाकडून माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच पुनर्रचित सल्लागार समितीवर राज्यातील अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. या शासकीय समितीवर कामगारांचे प्रतिनिधित्व म्हणून कामगार नेते व महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफानभाई सय्यद यांची सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाच्या उपसचिवांनी राज्याच्या कामगार आयुक्तांकडे कामगार प्रतिनिधी सदस्यांची माथाडी अधिनियम ११६९ च्या कलम ९ (१) मधील तरतुदीनुसार वैधानिक बाबी तपासून माहितीसह शासनास त्वरित अहवाल सादर करण्यास पत्रव्यवहार केला आहे. याबाबतचे आदेश राज्याचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांनी काढले आहेत.
माहिती देताना इरफानभाई सय्यद म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या सात दशकांनंतरही हमालीचे काम करणाऱ्या कामगारांना संरक्षण देणारा कायदा फक्त महाराष्ट्रातच अस्तित्वात आहे. कायद्याच्या निर्मितीला ५० वर्षे झाली असतानाच, राज्यात सर्वत्र माथाडी कामगार चळवळीला घरघर लागण्यास सुरुवात झाली होती. गेल्या १५ वर्षांपासून कामगारांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित होते. शासनाच्या वतीने प्रश्न सोडविण्याचे फक्त आश्वासन दिले जात होते. प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जायचे. मात्र, सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर दिला. त्याचीच परिणीती म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना झाली. पुनर्रचित सल्लागार समितीवर युनियनच्या अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक झाली.
सत्तेवर येताच उद्धवसाहेब व महाविकास आघाडी सरकारने माथाडी कामगार आणि असंघटित कामगारांच्या बाबतीत अनेक धडाकेबाज निर्णय घेत हे सरकार कामगारांच्या बाजूने असल्याचा पुन्हा एकदा दाखला दिला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्य कामगार मंत्रालयाच्या पुनर्रचित सल्लागार समितीवर संधी देऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या माध्यमातून कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांची प्रगती साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
– इरफानभाई सय्यद (कामगार नेते)….














