- राज्य शासनाच्या वन विभागाचा महत्त्वाकांक्षी निर्णय..
- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- राज्यातील पहिला डिअर पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आरक्षित जागेचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या वनविभागाने घेतला आहे. याबाबत गुरुवारी महसूल व वनविभागाने अद्यादेश जारी केला.
भोसरी विधानसभा मतदार संघात असलेल्या तळवडे येथे पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्यानुसार सर्व्हे नं. १ ब मध्ये हरिण उद्यान (डिअर पार्क) / प्राणी संग्रहालयाचे आरक्षण आहे. मात्र, ही जागा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या ताब्यात होती. परिणामी, हा प्रकल्प सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासनाला तांत्रित अडचणी येत होत्या.
दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी २०१६ पासून ‘डिअर पार्क’ आरक्षण विकसित करण्यासाठी जागा महापालिकेकडे हस्तांतरित करावे, याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल व वनविभागाकडे वारंवार मागणी केल्यानंतर अखेर आज (१७ डिसेंबर २०२०) शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
तळवडे येथे तब्बल ५६ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिअर पार्क साकारणार आहे. त्याचे काम २०२१ मध्ये सुरू होईल. अवघ्या ३ वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करावा, असे बंधन वन विभागाने अर्थात राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला घातले आहे. देश-विदेशातील पर्यटकांना पिंपरी-चिंचवडमधील डिअर पार्क आकर्षित करणार आहे. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.















