- महिलांसाठी शहरातील व्यायामशाळांमध्ये दररोज दोन तास राखीव वेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांची प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. रोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक तास या प्रमाणे दररोज दोन तास राखीव वेळ ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शहरात ८२ व्यायामशाळा आहेत. त्यातील ३२ व्यायामशाळा महापालिकेतर्फे तर ५० व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर खासगी संस्थामार्फत चालविल्या जात आहेत. मार्चपासून व्यायामशाळा बंद होत्या. आता त्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना काळात महिला व नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे.
महिलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सर्व व्यायामशाळामध्ये सकाळी एक तास व सायंकाळी एक तास असे दोन तास महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणा-या व्यायामशाळांमध्ये सकाळी नऊ ते दहा आणि दुपारी चार ते पाच महिलांसाठी राखीव वेळ असणार आहे. सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळांमध्ये सकाळी दहा ते ११ आणि दुपारी तीन ते चार महिलांसाठी राखीव वेळ असणार आहे.














