- ‘मोरया’चा संजीवन समाधी सोहळा कोरोनाच्या सावटाखाली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळा महोत्सवानिमित्त चिंचवडगाव येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवार (दि. ३१) ते सोमवार (दि. ४) दरम्यान संचारबंदी राहणार आहे.
श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळा महोत्सवानिमित्त दरवर्षी ३० ते ३५ हजार भाविक चिंचवड येथे दर्शन व महाप्रसादासाठी येतात. चिंचवडसह मोरगाव, थेऊर व सिद्धटेक या तीर्थक्षेत्रांवरून तसेच जिल्ह्यातील भाविक या सोहळ्यास उपस्थिती लावतात.
यंदा १ ते ४ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे. शनिवारी (दि. २) संकष्ट चतुर्थी असून सोमवारी (दि. ४) महाप्रसादाचे ओयोजन केले आहे. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ २० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार जमावबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेला यातून वगळण्यात आले आहे.