- अतिरिक्त कामाच्या नावाखाली स्थायीची वाढीव ४ कोटींच्या खर्चास मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- चिंचवडगावातील बिजलीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या अंडरपासचे (भुयारी मार्ग) काम रखडलेले आहे. मुदत संपल्यानंतर हे काम सुरू असून व अतिरिक्त काम झाल्याचे कारण सांगून या कामासाठी सुमारे ४ कोटी ६७ लाखांचा वाढीव खर्च करण्यात येत आहे. हा वाढीव खर्चासह सुधारित खर्चास स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली.
पालिकेच्या वतीने प्राधिकरण, बिजलीनगर, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी व रेल विहार सोसायटी येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी बिजलीनगरकडून गुरुद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावर अंडरपास बांधण्यात येत आहे. ते काम सुरू असून, कृष्णाई इन्स्ट्रक्चर प्रा.लि. या ठेकेदारामार्फत काम सुरू आहे. कामाचा एकूण खर्च अदा करण्यात आला आहे.
२ वर्षांची मुदत २ मार्चला संपली. कामास मुदतवाढ देण्यात आली आहे. या रेंगाळलेल्या कामासाठी आता कोट्यवधीचावाढीव खर्च केला जात आहे. जलवाहिनी व विद्युत केबलसाठीचे खोदकाम झाले. या अंडरपासच्या कामासाठी कठीण खडकामध्ये खोदकाम करावे लागले आहे. कठीण खडकात खोदल्यामुळे १ कोटी २४ लाखांची वाढ झाली. यासह बांधकामातील बदल, स्टीलचे वाढलेले दर, अंडरपासच्या भिंतींसाठी, टाईल्समध्ये केलेला बदल, विद्युत वाहिनी, जलवाहिनी स्थलांतरीत करणे, मॅनहॉल चेंबर्सचे बांधकाम अशा विविध कारणांसाठी या कामाचा खर्च वाढला आहे. एकूण ४ कोटी ६६ लाख ४८ हजार ५६३ रुपयांचा खर्च वाढला आहे. १४ कोटी २५ हजारांचे हे काम आता १८ कोटी ६६ लाख ७४ हजार १८८ रुपयांवर पोहोचले आहे. तब्बल ४ कोटी ६६ लाख रुपये वाढीव खर्च अदा करण्यास प्रस्तावाला समितीने ऐनवेळी मंजुरी दिली.











