न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- कोरोना काळात नागरिकांना शहरातील बगीचे आणि पार्क हेदेखील परके झाले होते. नागरिकांच्या आरोग्य समस्यांना आळा घालायला प्रशासनाने काही निर्बंध घातले होते. त्यामध्ये प्रमुख बगीचे आणि पार्कच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले होते. पहाटे ६ ते सकाळी ८ असे केवळ दोन तास नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून व्यायाम आणि मॉर्निंग वॉक ला मुकले होते.
संभाजीनगर येथील शिवाजी पार्क उद्यानाला चिखली आणि अन्य भागातील शेकडो नागरिक आपल्या नित्य व्यायामाचा भाग म्हणून वर्षानुवर्षे सकाळी आणि सायंकाळी आवर्जून हजेरी लावतात. कोरोना काळात बगीचे आणि गार्डन हे दोन तास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते आणि आता नवीन वर्षाच्या आगमनाच्या शुभ प्रसंगी ज्यावेळी कोरोना साथ आटोक्यात येऊ लागली आहे. नागरिकांना पुन्हा व्यायामाला वाव मिळावा म्हणून मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी पुढाकार घेत शिवाजी पार्क उद्यानाची वेळ वाढवून घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. ज्याची दखल घेत उद्यान विभागाने दर दिवशी पहाटे ६ ते सकाळी १० अशी सुधारित वेळ आता पार्क शौकिनांसाठी राखीव केली आहे.
त्यामुळे नवीन वर्षाची आगळीवेगळी भेट यानिमित्ताने दिनेश यादव यांच्याकडून नागरिकांना देण्यात आली आहे ज्याने नागरिकांचे आरोग्य जतन आणि नित्य व्यायामाला मदत होणार असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.यादव यांच्या पुढाकाराने नागरिकांना जी अडचण भासत होती ती दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत.











