चिंचवड माथाडी बोर्डाचा हेकेखोरपणा; नामनिर्देशित सदस्यांचा बोर्डाकडून अवमान..
राज्य शासनाकडे बोर्डाच्या अकार्यक्षमतेची करणार तक्रार..
कामगार नेते इरफान सय्यद यांचा संताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- मोठा गाजावाजा करून राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर सदस्यपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्याची अंमलबजावणी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात झाली. पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्यांच्या नेमणुका झाल्या. मात्र, उद्योगनगरीचे बिरूद मिरविणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड माथाडी मंडळाकडून राज्याच्या उपसचिवाच्या आदेशाला सोयीस्करपणे केराची टोपली दाखविली जात आहे. गेल्या तीन महिन्यापासून माथाडी मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्त सदस्यांचे साधे अभिनंदन करण्याचे औदार्यही या मंडळाने दाखविलेले नाही. कामगारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असणारे पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळ आपल्या बेजाबदार वर्तनातून रामभरोसे कामकाज करीत आहे. कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या या मंडळाच्या कारभाराचे कामगार नेते इरफान सय्यद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे चांगलेच वाभाडे काढले आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील बहुतांश कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद आहेत. माथाडी मंडळात काम करताना या कामगारांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. मागील अनेक वर्षांपासून माथाडी मंडळावर सदस्याची नेमणूक न झाल्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न मंडळाकडे पडून आहेत. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयांतर्गत चिंचवड येथे माथाडी बोर्ड कार्यरत आहे. या बोर्डावर राज्याच्या कामगार मंत्रालयाकडून पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्यांच्या नुकत्याच नेमणुका करण्यात आल्या. तसे पत्रही राज्य शासनाकडून देण्यात आले. मात्र, चिंचवड माथाडी बोर्डाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहे. बोर्डाच्या सल्लागार समितीच्या संचालकांकडून जबाबदारी झटकण्यात येत आहे. नेमणुका होऊन तीन महिने झाले साधी अभिनंदनपर बैठकदेखील बोर्डाकडून झालेली नाही. नियुक्त्या तर दूरच. उद्योगनगरीच्या उलट पुणे माथाडी बोर्ड असून सदस्यांच्या नियुक्तीपासून ते बैठकापर्यंत ते सक्रीय आहे. चिंचवड माथाडी बोर्डाने याचा बोध घ्यावा.
पिंपरी चिंचवड एमआयडीसीसह संपूर्ण ७ तालुक्यांची जबाबदारी असलेल्या या विभागातील अधिकाऱ्यांच्या दिशाहीन कारभारामुळे त्याचा विपरीत परिणाम कामगारांच्या भविष्यावर पडत आहे. माथाडी कामगारांसाठी शासनाने माथाडी मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी योजना आखल्या, पण प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेक माथाडी कष्टकरी योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्रीच आहेत. बोर्डाकडून कामगार व कारखानदारांमध्ये समन्वय साधणे, औद्योगिक शांतता कायम करणे तसेच विविध कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. त्यामुळे कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा विभाग महत्त्वाचा असा आहे. कामगारांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने व अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने कामगार संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आम्ही कामगार प्रतिनिधी असून चिंचवड माथाडी बोर्डाचा हेकेखोरपणा खपवून घेणार नाहीत. आपल्या अकार्यक्षमतेने नामनिर्देशित सदस्यांचा चिंचवड माथाडी बोर्डाने अवमान केला असून, त्याची लवकरच राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचे कामगार नेते इरफान सय्यद यांनी या पत्रकात म्हटले आहे.