- पोलिसांच्या एक्स ट्रॅकर व सोशल मीडिया पेजेसचा लोकार्पण सोहळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या १५ पोलीस स्टेशन आहेत. शिरगाव, रावेत आणि म्हाळुंगे या तीन पोलीस ठाण्यांना नव्याने मंजुरी मिळाल्याने शहर पोलीस हद्दीत आता १८ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्या सर्व पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले असून त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रम आणि विविध सोशल मीडिया पेजेसचा लोकार्पण सोहळा आज (शुक्रवारी, दि. ५) चिंचवड येथे पार पडला. एक्स ट्रॅकर अॅप्लिकेशन, सेवा उपक्रमाचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केले. स्मार्ट पोलिसिंगचे सादरीकरण उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते.
चिखली, तळेगाव एमआयडीसी, दिघी, आळंदी, निगडी पोलीस ठाण्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. महसेतुचे सीईओ ओंकार गौरीधर, सीईओ शशी भट, प्राचार्य किशोर रवंडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. अमरनाथ वाघमोडे यांना प्रातिनिधिक हेल्थ कार्ड देण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त आर आर पाटील बदली झाल्याबद्दल त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. नागरिकांच्या सूचना, तक्रारी तसेच वेगवेगळ्या विषयांवरील मते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस घेणार आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांचा सोशली वावर अधिक सक्रिय करण्यासाठी सोशल मीडिया पेजेस नव्याने सुरू करण्यात आली आहेत.
प्रास्ताविक पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आभार मानले.
ट्विटर – www.twitter.com/pccity.police/
इन्स्टाग्राम – https://instagram.com/pccitypolice?igshid=1e6tbh5363xx2