न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- स्वच्छ हगणदारीमुक्त भारत अभियानाअंतर्गत शहरांना मानांकन देण्यात येते. पिंपरी चिंचवड महापालिकेस ‘ओडीएफ प्लस प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. मानांकनासाठी केंद्र शासनामार्फत पाठविण्यात आलेल्या पथकामार्फत १४ ते १७ डिसेंबर २०२० या कालावधीत शहरामध्ये पाहणी करण्यात आली होती.
पाहणीमध्ये पथकामार्फत शहरातील शुध्दीकरण केंद्र, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये व सार्वजनिक मुताऱ्यांची तपासणी करण्यात आली. पथकामार्फत झालेल्या पाहणीनुसार केंद्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या मानांकन यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहरास ‘ ओडीएफ प्लस प्लस ‘ मानांकन देण्यात आलेले आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याचे उद्देशाने पालिकमार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळे व स्वच्छ अभियानामध्ये नोंदविलेल्या सहभागामुळे महापालिकेस ‘ओडीएफ प्लस प्लस’ हे मानांकन प्राप्त झाले आहे, असे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.