- पीएमपीएमएलचे उत्पन्न योग्य मार्गावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- कोरोनाच्या काळात उत्पन्न घटल्यामुळे पीएमपीएल आर्थिक संकटात सापडली होती. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरातील बाजारपेठा, व्यवसाय, शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. याचा फायदा पीएमपीएलचे उत्पन्न वाढण्यास होत आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदाच १ फेब्रुवारीला पीएमपीएमएलला १ कोटी ५ लाखाचे उत्पन्न मिळाले. यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारीपासून रोज १ कोटींच्या जवळ पीएमपीएलचे उत्पन्न जात आहे. जानेवारीमध्ये दररोज ६० ते ७० लाखाच्या दरम्यान उत्पन्न मिळत होते. रोजच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सध्या रोजची प्रवास संख्या ही ७ लाखांचावर गेली आहे. त्यामुळे बसची संख्या वाढविण्यात आली आहे.
सध्या रोज १५०० बस रस्त्यावर धावत आहेत. शाळा सुरू झाल्या असून, महाविद्यालय १५ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने अजून रोज १०० बस वाढविण्याचे नियोजन पीएमपीएल प्रशासन करीत आहे. कोरोना काळात काम नसल्याने पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेत कामासाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. प्रवासी संख्या वाढल्याने बस वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे आता पीएमपीएलला कर्मचाऱ्यांची गरज आहे. येत्या एक दोन दिवसात पिंपरी चिंचवड महापालिकेत कामाला पाठविलेले कर्मचारी पीएमपीएलमध्ये परत येणार आहेत. कोरोनाच्या काळात सामान्य प्रवाशांसाठी पीएमपीएलची बस सेवा सहा महिने बंद होती. परिणामी याचा मोठा आर्थिक फटका पीएमपीएला बसला.