- स्मार्ट सिटीच्या सुधारीत अंदाजपत्रकास संचालक मंडळाची मान्यता..
- पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी तुलनात्मक विकास पद्धती राबविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची बारावी बैठक शुक्रवार, (दि.१२) रोजी सकाळी ११.३० वा, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय, ऑटोक्लस्टर चिंचवड येथे आयोजीत करण्यात आली होती. पॅनसिटीतील विकासानंतर स्मार्ट सिटीतील दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू केले आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत पिंपरी – चिंचवड शहरातील अविकसित भागाचा समावेश केला जाणार आहे. त्यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले .
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, एरिया बेस अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात नवीन भागाचा समावेश केला जाणार आहे. कोणता भाग, कोणत्या तत्त्वावर व निवडावा याबाबत चर्चा झाली. त्या भागाच्या आजच्या स्थितीला झालेला विकास, किती आरक्षणे विकसित झाले आहेत. अविकसित, ग्रीन क्षेत्र किती आहे. रहिवासीकरण किती झाले आहे. व्यावासायिक दृष्टीने विचार करता मॉल आहेत का?, नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील का?, नागरिकांच्या गरजा पूर्ण होतील का?, किफायतशीर दरात घरे उपलब्ध होतील का?, व्यावासायिक, निवासी मालमत्तांची किती वाढ होईल. त्यामुळे मालमत्ता करातून भविष्यात महापालिकेला उत्पन्न किती मिळेल याचा विचार करून विकास केला जाणार आहे.
या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणुन नितिन करीर चेअरमन, मा.महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, प्रमोद कुटे, सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी ममता बात्रा, राजेंद्र जगताप, मुख्य व्यवस्थापकीय संचालक PMPML, कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त, श्रावण हर्डीकर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड हे सर्व संचालक सभेस उपस्थित होते. या व्यतिरीक्त मा. सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण व राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी जितेंद्र कोळंबे, अशोक भालकर, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रकचर, मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता सभेस उपस्थित होते.
सभेत SPV Business Plan प्रकल्पातंर्गत पिंपरी चिंचवड शहरातील क्षेत्र आधारित विकास (ABD) च्या पुढच्या टप्प्याची निवड करण्यासाठी राहणीमानाशी संबंधित मापदंड(Livability Parameters), बांधकामाची घनता(Construction Density), कर भरण्याची क्षमता(Tax Revenue Potential) इ. घटकांचा विचार केला गेला आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या उपग्रह छायाचित्राच्या (Satellite Image) बांधकाम घनतेचे (Construction Density)चे विश्लेषण करून किवळे, रावेत, पुनावळे , ताथवडे, चऱ्होली, दापोडी, फुगेवाडी आणि तळवडे या भागांचा विश्लेषण करणेकामी समावेश करणेत आला होता. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांच्या मिळकतीचे विश्लेषण करता असे दिसून आले की महानगरपालिकेस पिंपरी वाघेरे, पिंपरी, सांगवी या भागातून सर्वाधिक मिळकत कर मिळत असून किवळे, मोशी आणि चऱ्होली या भागातून तुलनात्मकदृष्ट्या कमी मिळकत कर प्राप्त होतो.
विश्लेषणासाठी निवड केलेल्या भागांमध्ये रस्ता बांधणी, वाहनतळ व्यवस्थापन, पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन तसेच मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, व्यावसायिक संकुले इत्यादी प्रकल्प राबवता येऊ शकतात. सदरचे प्रकल्प हाती घेतल्यास महानगरपालिकेकडे जमा होणाऱ्या विकास शुल्क आणि मिळकत करामध्ये भर पडून महानगरपालिकेची आर्थिक बाजू भक्कम होणेकामी मदत होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता किवळे, रावेत, मोशी या भागांचा brownfield development साठी तसेच दापोडी आणि आनंदनगर या भागांचा पुनर्विकास करणेकामी आणखी सखोल विश्लेषण करणेसाठी संचालक मंडळामार्फत संबंधितांना सुचना देणेत आलेल्या आहेत.
तसेच सन २०२०-२१ चे भांडवली व महसूली खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रकास संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी करिता सुनिल भोसले यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नव्याने ११ महिने कालावधीसाठी नियुक्त करणेकामी तसेच विविध पदांची नियुक्ती करणेकामी संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी व बजाज ग्राम विकास संस्था यांचे सोबत Memorandum of
Understanding (MoU) करणेकामी संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.


















