- संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- निगडी येथे प्रभात कल्चरल फाऊंडेशन व नंदकिशोर कल्चरल अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वे वार्षिक महोत्सवात संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी प्रित्यर्थ प्रभात कल्चरल फाऊंडेशन युवा पुरस्कार विनोद सुतार (तबला) पै. बाबूमियॉ बँडवाले पुरस्कार मिलिंद दलाल (व्हायोलिन वादन) गुरुवर्य पंडीत पद्माकर बुवा कुलकर्णी पुरस्कार समीर कुलकर्णी (सतार वादन) यांना डॉ. कपोते, उद्योजक प्रवीण पोकरणा, अॅड. शिवाजी जांभूळकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ स्वरुपात प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रभात कल्चरल फाँडेशनचे अध्यक्ष लतीफ सय्यद, उपाध्यक्ष शाहरुख सय्यद, खजिनदार विठ्ठल मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुब्रोतो देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्ष लतिफ सय्यद, चिंतामणी नातू यांचे शास्त्रीय व धृपद गायन झाले. त्याला साथसंगत संतोष साळवे, प्रसाद कोटी, शिवनारायण काशीद यांनी दिली.
डॉ. पंडीत नंदकिशोर कपोते पुढे म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दहा ते अकरा महिने कलाकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, अशा स्थितीतही काहींनी ऑनलाईन संगीताचे धडे आत्मसात केले. या कामगारनगरीत प्रत्येकाने एकतरी कला आत्मसात करावी, त्याचे प्रमुख कारण सुख-दुःखात कला आयुष्यभर साथ सोडत नाही. सराव व सातत्य असेल तर उत्तम कलाकार निर्माण होवू शकतात. नगर येथील पै. बाबूमिया बँडवाले ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक व उत्तम क्लेरोनेट वादक होते. त्याची ख्याती दूरपर्यंत होती, तसेच पंडीत पद्माकर बुवा कुलकर्णी यांनी शास्त्रीय गायन क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना कलाकार म्हणून घडविले. पिंपरी चिंचवड शहरात संगीत रुजविले ही कौतुकास्पद बाब आहे. प्रभात कल्चरल फाऊंडेशन संस्था गेली १८ वर्षे सातत्याने संगीत क्षेत्रात उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देत गुणी कलाकारांचा सत्कार पुरस्कार स्वरुपात देत आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रासंचालन विठ्ठल मोरे यांनी केली आभार शगुप्ता सय्यद यांनी मानले.