- बी. के. खोसे एजन्सीला वाढीव दराने बहाल केलेल्या निविदेमध्ये कोणाचे हात ओले होणार?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाची स्थापना करण्यात येणार आहे. या कामाकरिता भरलेल्या निविदांमध्ये रिंग झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच निविदा भरलेल्या त्या संगणकांचा आय. पी. ऍड्रेस नंबरची माहिती लेखी स्वरुपात तीन दिवसात देण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
वारकरी सांप्रदायाचे भक्तिस्थान असलेल्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी व संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावदरम्यान असलेल्या भौगोलिक स्थानामुळे या दोन्ही तिर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या वारकऱ्यांचा चिखलीत वावर असतो. संत तुकाराम महाराजांचे टाळ या चिखलीत पडले म्हणून या गावाचा उल्लेख टाळगाव चिखली असा देखील केला जातो. वारकरी सांप्रदायाचे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, त्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, याकरिता महापालिकेने चिखलीत जगतगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा निर्णय घेतला.
या संतपीठ उभारणीस दि. १३ मे २०१५ रोजी पालिका सभेत मान्यता मिळाली. त्यानंतर चिखलीतील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित सर्व्हे क्रमांक १६५३ मधील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतर करुन दिली. यामुळे संतपीठाच्या कामकाजाला गती मिळाली आहे. या कामासाठी ४० कोटी १३ लाख ७९ हजार दराने पालिकेने निविदा मागविली होती. मात्र, ठेकेदार खोसे यांची ४५ कोटी ९ लाख अशी वाढीव दराची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्याला स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली जाणार आहे.
सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी सर्वच कामात “रिंग’ करीत आहेत. आता वारकरी सांप्रदायाच्या पवित्र कामातही भ्रष्टाचार करून मलिदा खात आहेत, असा आरोप साने यांनी केला आहे. ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संतपीठाच्या इमारतीसाठी तब्बल ४५ कोटी ९ लाख रूपये खर्चास पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. हा ११.१६ टक्के वाढीव दर आहे. अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून ही निविदा प्रक्रिया राबविली आहे. हे काम बी. के. खोसे एजन्सीला वाढीव दराने बहाल करण्यात येणार आहे.
सत्ताधारी भाजपकडून ज्ञानदानाच्या पवित्र कामातही भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोप साने यांनी केला आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत हस्तक्षेप करुन ही निविदा प्रक्रिया न रोखल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे दत्ता साने यांनी सांगितले आहे.










