- सहा महिने उलटूनही व्यवसाय प्रशिक्षण योजना कागदावरच..
- मागासवर्गीय युवक-युवती प्रशिक्षणाअभावी स्व-कल्याणापासून वंचित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- मोठा गाजावाजा करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने शहरातील मागासवर्गीय युवकांच्या कल्याणासाठी “मागासवर्गीय युवकांना/युवतींना विविध व्यवसाय प्रशिक्षण’ या गोंडस शीर्षकाखालील योजनेस मंजुरी दिली. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही योजना केवळ कागदावरच कार्यान्वित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना व्हायरसच्या पाश्वभुमीवर सर्व नियमांचे पालन करून ही योजना राबविण्याचा ठराव मंजूर असतानासुद्धा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज शहरातील हजारो मागासवर्गीय युवक-युवती प्रशिक्षणापासून वंचित राहिले आहेत. पालिका प्रशासनाला मागासवर्गीय युवकांचा एवढा तिटकारा का? प्रशिक्षण द्यायचेच नव्हते तर, योजनेचा बागुलबुवा कोणासाठी केला ते तरी आम्हाला कळू द्या, असा सवाल मागासवर्गीय युवक उपस्थित करू लागले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने शहरात युवक, युवती, महिला, विद्यार्थी, अपंग बांधव आदींच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयमध्ये समाविष्ट सर्व जाती व तत्सम पोटजाती या प्रवर्गातील युवक-युवतींचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास साधण्याच्या दुष्टीने ”मागासवर्गीय युवकांना / युवतींना विविध व्यवसाय प्रशिक्षण’ देण्यात येते. सन २०२०-२१ महापालिकेच्या अंदाजपत्रक/अर्थसंकल्पात नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत या योजनेसाठी “मागासवर्गीय युवकांना/युवतींना विविध व्यवसाय प्रशिक्षण या उपलेखाशिर्षावरील कामासाठी निधी राखीव आहे.
या प्रशिक्षण योजनेसाठी पालिकेच्या शहर सुधारणा समिती ८/६/२०२० सभेत ठराव क्रमांक २२, विषय क्र ०३ अन्वये प्रस्तावित केल्यानुसार आकुर्डीतील मे. नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया (एन.सी.आय.टी) (इंडीया) संस्थेमार्फत योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागासवर्गीय युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यास येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्याकामी मा. शहर सुधारणा समितीने स्थायी समितीकडे शिफारस केली. दि. १७.०६.२०२० रोजी स्थायी समितीच्या झालेल्या सभेत ठराव क्रमांक- ७१६५, विषय क्र ६ अन्वये सन २०२०-२१ आर्थिक वर्षातील दिनांक. ३१/०३/२०२१ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण राबविणेकामी व योजनेच्या अमंलबजावणीच्या धोरणास येणा-या प्रत्यक्ष खर्चास मा. स्थायी समितीने दि.१७.०६.२०२० रोजी मान्यता दिली. या ठरावात मागासवर्गीय युवकांना/युवतींना विविध व्यवसाय प्रशिक्षण हे वस्तीपातळीवर द्यायचे आहे. त्यामुळे वस्ती पातळीवर प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करणे, प्रशिक्षणनिहाय आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करणे, प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक तसेच इतर मनुष्यबळ यांची नेमणुक करून मानधन ठरवणे आदी प्रशासकीय व तांत्रिक कामकाजाचा समावेश होता. मात्र, कोरोनामुळे योजनेला मान्यता मिळूनही ही योजना कार्यन्वित न होता प्रशासकिय दप्तरात रेंगाळली. आजपावतो सहा महिन्याचा कालावधी उलटूनही पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून पुढील कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या सांगकाम्या बाबूंना मागासवर्गीय युवकांचे कल्याण पाहावत नाही का? असा सवाल उपस्थित होऊ पाहत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मागासवर्गीय युवकांचा स्वतःच्या पायावर उभे राहुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास साधण्याचा उद्देश सफलतेपासून दूरच राहिला. आजतागायत प्रशिक्षण योजना राबविण्याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणताही आदेश एन.सी.आय.टी या संस्थेस प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मागासवर्गीय युवक-युवती प्रशिक्षणाअभावी स्व-कल्याणापासून वंचित राहत आहेत, ही खुप मोठी शोकांतिका आहे?.