- स्क्वेअर कटस स्पोटर्सच्या मालकांवर गुन्हा; वाकडमधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- आयपीएलच्या धर्तीवर मराठा लीग ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे सांगून त्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले. सहा महिन्यांत २० टक्के परताव्याचे आमिष दाखविले. मात्र गुंतवणूक केलेली रक्कम तसेच त्यावरील परतावा न देता एक कोटी ४८ लाख ३१ हजारांची फसवणूक केली.
वाकड येथे १ मार्च २०२० ते ६ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. स्क्वेअर कटस स्पोटर्स प्रा. लि. कंपनीचे विन्सेंट जॉन, त्याची पत्नी पूनम साहू, रवी पनवर, गणेश दिघे, नरेश लक्ष्मणराव पिल्ले, अभिजित रावकर, अलिशा शेख (पूर्ण नाव माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मॅकविन जेरोम सलढाना (वय ४६, रा. माहीम) यांनी शनिवारी (दि ६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून स्क्वेअर कटस स्पोटर्स प्रा. लि. कंपनीच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर मराठा लीग ही क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच फिर्यादी यांना कंपनीच्या संचालकपदावर घेतल्याचे बनावट पत्र दिले. त्यानंतर कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून करार केला. गुंतवणुकीवर २० टक्के परताव्याचे आमिष दाखविले. परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटण्यासाठी स्टॉप पेमेंट केले. आरोपींनी फिर्यादी मॅकविन, त्यांचे मित्र महेंद्र शहा, पल्लवी महेंद्र शहा आणि दिशा उमंग शहा यांच्याकडून घेतलेली रक्कत परत न देता त्यांची एक कोटी ४८ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केली.
















