- निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मार्च २०२१) :- फिर्यादी व त्यांचा जखमी मित्र व आणखी एकजण पेंटिंगचे काम करतात. त्यांनी चाकण एमआयडीसी येथे एकाकडे तीन दिवस पेंटिंगचे काम केले होते. त्या कामाचे पैसे घेण्यासाठी ते मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंकुश चौक, निगडी येथे कामगार नाक्यावर थांबले होते.
त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी यांच्याजवळ येऊन ‘तुम्ही आज सुट्टी का घेतली. मी शेठला फोन करून तुमच्या कामाचे पैसे द्यायला सांगतो’ असे म्हटले. त्यावर त्यावर त्यांनी ‘तू कशाला फोन लावतोस. आमचे आम्ही बघून घेऊ.’ असे म्हटले. त्यावरून राग आल्याने आरोपीने शेजारी पंक्चरच्या दुकानातील लोखंडी रॉडने एकाच्या डोक्यात मारले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी पळून गेला.
विकास मोरे असे जखमी कामगाराचे नाव आहे. याबाबत सुरज मंगलसिंग राजपूत (वय ३०, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिद्धार्थ वाघमारे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.











