- विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीने ‘पॅन सिटी’चा प्रकल्प हाती घेतला असून, या कामांसाठी ‘सिस्टीम इंटीग्रेटर’ म्हणून मेसर्स लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) कंपनीची निवड केली आहे. हे काम ३०१ कोटी रुपयांमध्ये ‘ एल अॅण्ड टी ‘ कंपनीस देण्यात आले आहे.
याबाबतच्या प्रस्तावास आज शुक्रवार (दि. २१) रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विरोधकांच्या शकांचे निरसन करण्यात आले असून, आक्षेपांचे समाधान केले आहे. त्यानंतरच एकमताने या निविदेला मंजुरी दिल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
या कामाची १३ एप्रिल २०१८ रोजी २५० कोटी ६० लाख रूपये अधिक जीएसटी असा खर्च अपेक्षित धरत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मेसर्स लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी), मेसर्स केईसी इंटरनॅशनल लिमिटेड (भारत संचार निगम लिमिटेडच्या साथीने) आणि मेसर्स अशोका बिल्डकॉन लिमिटेड (टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेडच्या साथीने) या तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
त्यातील मेसर्स अशोका बिल्डकॉन हा कंत्राटदार ‘कि ऑस्क’ च्या निकषात बसत नसल्याने अपात्र ठरला. तर, मेसर्स लार्सन अॅण्ड टुब्रो आणि मेसर्स केईसी इंटरनॅशनल लिमिटेडच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दराची २५५ कोटी (करवगळता) आणि ३०० कोटी ९० लाख रुपये (करासहित) एल अॅण्ड टी कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्याला आज सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.
फायबर केबल नेटवर्किंगचे काम एल ॲन्ड टी कंपनीला देण्यास राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे संचालकांसह सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. त्या स्मार्ट सिटी निविदेत रिंग झाल्याचा आरोपही केला होता. मात्र, एल. ॲन्ड. टी. कंपनीशी विरोधी संचालकांची गुप्त बैठकीनंतर स्मार्ट सिटीच्या बैठकीत विरोधक अचानक गारद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सत्ताधारी भाजप व आयुक्तांनी या गुप्त बैठकीत विरोधकांना असे काय स्पष्टीकरण दिले, ज्याचा परिणाम विरोधकांच्या विरोधी भूमिकेची तलवार म्यान होण्यात झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम मात्र, सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शक मुद्द्यावर व विरोधकांच्या विरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.










