- पालिकेकडून कठोर भूमिका; मालमत्ता जप्तीची धडक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- शहरातील २५ लाखांवरील मिळकतकर थकबाकीदार, तसेच इतर थकबाकीदारांनी संपूर्ण बिल न भरल्यास महापालिकेच्या वतीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.१६) दिला आहे.
आतापर्यंत ४९५ कोटींचा कर जमा झाला आहे. ३१ मार्चपर्यंत ३७५ कोटींची बिले अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पालिकेने कठोर भूमिका घेतली असून, या पुढे थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीची धडक कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळ तसेच, क्षेत्रीय कार्यालय व कर संकलन कार्यालयात लावण्यात आली आहेत.
मिळकतधारकांनी ३१ मार्चपूर्वी संपूर्ण थकबाकीसह बिल भरावे आणि ७५ टक्के विलंब शुल्कात सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, आतापर्यंत ७ हजार ४०१ मिळकतधारकांनी या सवलतीचा लाभ घेतला असून, एकूण ८८ कोटी ४९ लाखांचा भरणा केला आहे.