- सलग तीन दिवसाच्या आगीमुळे शेकडो झाडे जळून खाक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २२ डिसें.) :- बिजलीनगर एमआयडीसी कॉलनी रोडवर अनेक दिवसांपासून प्लास्टिकचा कचरा जाळला जात आहे. या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचे सदस्य विजय मुनोत, विजय जगताप, बाबासाहेब घाळी, अमोल कानु, अमित डांगे, अमृत महाजनी, संतोष चव्हाण तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व पडताळणी केली असता धक्कादायक बाब उजेडात आली.
भिंतीचा आडोसा घेऊन या ठिकाणी २०० टन पेक्षा जास्त कचरा जमा करून जाळला जात असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे कचरा जाळला जात असताना आग बाजूलाच उभ्या असणाऱ्या झाडांपर्यंत पोहचून शेकडो झाडे जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. पर्यावरण अभ्यासक विजय जगताप यांच्या दक्षतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात पर्यावरण प्रेमींना यश आले. त्यामुळे परिसरातील अनेक झाडांना जीवदान मिळाले .परंतु, गेल्या तीन दिवसांपासून सतत प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत आहे. तसेच धुरामुळे प्रदूषनातही वाढ होत आहे.
परिसरात ओढ्याच्या जवळच कचरा डम्पिंगचे ठिकाण असून दिवसभर या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. चिंचवड परिसरातील सर्व कचऱ्याच्या गाड्या इथे कचरा घेऊन येतात. गरीब, गरजू कचरा वेचक या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिकयुक्त कचरा भिंतीच्या पलीकडे टाकतात. अश्या मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यास रात्री च्या वेळेस आग लावली जाते.
सतत जाळला जात असलेल्या कचऱ्यामुळे एमआयडीसी कॉलनीमधील भिंतीलगतचा आतील कित्येक मीटर भाग हा आता भग्न अवस्थेत पोहचलेला आहे. एकेकाळी गर्द झाडी असलेला झाडाचा परिसर हा आगीमुळे खाक झालेला आहे. प्लास्टिकचा कचरा जाळनाऱ्यांनी तीन ठिकाणी एमआयडीसी कॉलनीच्या सुरक्षा भिंतीला भगदाड पाडले आहे. सतत लावणाऱ्या आगीमुळे शेकडो झाडे खाक होऊन पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने तातडीने सदरच्या परिसराची पाहणी करून कचरा जाळणे बंद करावे.
मोठा गाजावाजा करून महानगरपालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली आहे. या घटनेस आज तीन दिवस उलटून गेले असून, एकाही वृक्ष प्राधिकरण सदस्याची साधी भेटही या घटनास्थळी आजपावतो नाही. त्यामुळे समिती सदस्यांनी या प्रश्नी लक्ष घालून या घटनेस जबाबदार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. – विजय पाटील, अध्यक्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती










