न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसें.) :- केवळ निधीची आवश्यक्ता भासल्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या पीएमपीला प्रशासनाला तुम्ही गाववाले असून, तुमचा गावरान इंगा दाखवा, अशा शब्दांत महापौर राहुल जाधव यांच्याकडे सदस्यांनी आग्रही मागणी केली. तसेच ऐनवेळी मांडलेल्या बस खरेदीचा विषय तहकूब करत, पीएमपीला सणसणीत चपराक लगावली आहे.
पूर्वाश्रमीच्या पीसीएमटी सेवेत असलेले १५५ कर्मचारी पीएमपीकडे वर्ग करण्यात आले आहेत. पीएमपीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात हे सर्व कर्मचारी पीएमपीकडे मनुष्यबळ कमी असल्याने वर्ग करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजु करण्यासाठी वर्ग करण्याची महापालिकेची प्रलंबित मागणी आहे. मात्र. आठवडाभरात या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करतो, दोन दिवसांत करतो, अशा भुलथापा पीएमपी प्रशासनाकडून मारल्या जात आहेत.
दरम्यान, पीमएपीकडून पूर्वाश्रमीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सापत्न भावाचा पाढाच नगरसेवकांनी सभागृहात वाचून दाखविला. पीएमपीच्या या कारभाराबाबत सभागृहात चर्चा होऊनही कारभारात किंचितही सुधारणा होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. ऐनवेळी मांडलेल्या बस खरेदी विषयावर मनसेचे सचिन चिखले यांनी चर्चेला सुरुवात केली. पुणे दर्शनच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्याची त्यांनी मागणी केली. त्याकरिता दोन डबल डेकर बस खरेदी करण्याची मागणी केली.
तर या मागणीचा धागा पकडत राष्ट्रवादीच्या मंगलल कदम तत्कालिन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या कार्यकाळातच पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव सुरु मंजुर करण्यात आला होता. मात्र. अद्यापही त्याची अंमलबजावणी केली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, पीएमीएमएलला पिंपरी-चिचवड शहराचे वावडे का आहे? असा प्रश्न उपस्थित केला. खास महिलांसाठी सुरू केलेली तेजसवीनी बससेवा गुंडाळण्यात आली. केवळ शहरातील टाटा मोटर्सकडून बस खरेदी केली जाणार असल्याचे समाधान का बाळगायचे असा त्रागा व्यक्त करत हा पिंपरी-चिंचवडकरांचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला.
पीएमपीचे मुख्य समन्वयक संतोष माने यांनी हे १५५ कर्मचारी दोन दिवसांत महापालिकेकडे वर्ग करणार असल्याचे सभागृहात निवेदन करताच, दत्ता साने यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. पूर्वाश्रमीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना सापत्न भावाच्या वागणुकीत एकाही कर्मचाऱ्याला पीएमपी प्रशासन किंमत देत नसेल, तर हा विषय तहकूब करण्याची मागणी केली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पीएमपीला एकूण १५०० बसची आवश्यक्ता असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, येत्या दोन दिवसांत १५५ कर्मचारी महापालिकेकडे वर्ग न केल्यास पीएमपीला निधी उपलब्ध करुन दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.










