- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
















