- रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध..
- उपाहारगृहे रात्री ८ वाजता बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२१) :- करोनाचे रुग्ण वाढल्याने पिंपरी चिंचवड शहरात आज, रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे रात्री ८ वाजताच बंद करण्यात येतील. करोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार पालिका आयुक्तांनी आदेशीत केले आहे. दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीस प्रत्येकी रकम रुपये १०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तू व सेवा जसे मेडिकल वगळून). हॉटेलमार्फत पार्सल सेवा घरपोच सेवा सुरु राहील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा संमेलने यांस संपुर्णतः प्रतिबंध राहील. त्याच अनुषंगाने भूमी पूजन, उदघाटन समारंभ व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रमास संपुर्णत: प्रतिबंध राहील.
नाट्यगृह / प्रेक्षागृह या ठिकाणी देखील सदर कार्यक्रम करणेस प्रतिबंध राहील. सदर नियमांचा भंग झाल्यास केंद्र सरकार कोविड -१९ आपत्ती संपुर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबधित आस्थापना बंद करण्यात येतील. तसेच आस्थापनाचे मालकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
















