- पोलीस बंदोबस्त असतानाही आरोपीकडून पलायन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- गुटखा वाहतूक प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने धूम ठोकली आहे. पोलीस चौकीत पोलिसाला धक्का देऊन खिडकीतून उडी मारून त्याने पलायन केले आहे. शिरगाव येथे बुधवारी (दि. ३१) रात्री पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. करम हौशीयतअली शेख (वय २९, रा. भिवंडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेख हा मुंबई येथून हडपसर येथे गुटखा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या सोमाटणे फाटा येथे आरोपी शेखला सामाजिक सुरक्षा पथकानी पकडले. त्याला बुधवारी वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीत असल्याने शिरगाव पोलिसांनी गुन्हाच्या तपासासाठी आरोपी शेख याला शिरगाव पोलीस चौकीत आणले. त्यावेळी रात्री पावणे नऊच्या सुमारास आरोपी शेख पळून गेला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर यांनी त्याला पकडण्याचा प्रयल केला. मात्र त्यांना धक्का देऊन पोलीस चौकीच्या मागच्या खिडकीतून उडी मारून आरोपी गेला.