न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने शहरातील अंध अपंग व्यक्तींना मोफत पीएमपीएल प्रवासासाठी पास दिले आहेत. या पासची मुदत १ एप्रिल ते ३१ मार्च अशी असते. एक एप्रिल असल्यामुळे बसमध्ये प्रवासी व वाहक यांच्यामध्ये तिकीट घेण्यासाठी वाद विवाद झाले.
हा सर्व प्रकार प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले व उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या निदर्शनास अपंग बांधवांनी आणून दिला. त्यांनी लगेचच पीएमपीएल कार्यालयात जाऊन ही यंत्रणा थांबवली. महापालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना बोलवून त्यांना परिस्थिती लक्षात आणून दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी ताबडतोब पंधरा दिवसांची मुदत वाढवून एक एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत जुनेच पास ग्राह्य धरण्यात यावेत, असे पत्र पीएमपीएल प्रशासनाला दिले आहे. पंधरा तारखेपर्यंत सर्व पासधारकांनी आपले पास नूतनीकरण घ्यावेत असे या पत्रामध्ये लिहिले आहे.
पीएमपीएलचे झेंडे यांनी याबाबत नवीन परिपत्रक काढून सर्व वाचकांना सूचना देणार आहे, असे सांगितले. पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे सर्व नियमांचे पालन करून पासचे नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने करण्यात आले.