- पीएमपीएल बससेवा, सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी..
- प्रशासन संपूर्ण लॉकडाऊनऐवजी अंशतः लॉकडाऊन लावण्यात यशस्वी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज (शनिवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
तसेच, अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.