- निगडी-भोसरी-पिंपरीतील तीन मुख्य दाहिण्या गॅसवर…
- तरीही, माणुसकी जपत मृतांच्या नातेवाईकांना प्राधिकरण कृती समितीचा ‘एक हात मदतीचा’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२१) :- गेल्या १५ दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीचे अक्षरशः तांडव सुरू आहे. दररोज हजारो रुग्ण शहरात उपचारासाठी धावाधाव करीत आहेत. रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रुग्णालयाबाहेर मिळेल त्या ठिकाणी रुग्ण तात्पुरता इलाज होईल ह्या आशेने पडून आहेत. रुग्णालयात डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत, अश्या कठीण काळात महापालिकेचा खरा चेहरा सुद्धा सामोरा आलेला आहे.
महापालिकेचा दैदिप्यमान इतिहास राज्यकर्त्यांनी चुकीच्या नियोजनामुळे धुळीस मिळवला. कुचकामी आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचे ‘सत्य’ आता सामोरे आले आहे. श्रीमंत महापालिकेची ही दुर्दैवी अवस्था “ह्याच देही ह्याच डोळा” लाखो करदाते हतबल होऊन पाहत आहेत. ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा ह्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे, अश्या गंभीर वातावरणात कोविड १९ विषाणूने त्याचे फास आवळायला सुरवात केली आहे. अनेक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आहेत. त्यातील अनेक जण मृत्यूचे मार्गक्रमण करीत आहेत. दरोरोज मृतांचा आकडा आता वाढत आहे.
अश्या कठीण परिस्थितीत शहरातील प्रमुख स्मशान भूमीवर मोठा ताण वाढलेला आहे. आपल्या शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागातील कोरोना लागण झालेले रुग्ण चांगल्या उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल होतात, त्यातील अनेक रुग्णांची स्थिती ही अत्यवस्थ असते. काही जण ती लढाई हारतात व दगावतात, त्यांचाही अंत्यविधी नियमाप्रमाणे विद्युतदाहीणीमध्ये करावा लागतो. असा शहराबाहेरील व्यक्तीच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही शहरातील प्रमुख विद्युत दाहिणींनवर पडत आहे.
निगडी, भोसरी आणि पिंपरी ह्या तीन ठिकाणी प्रमुख दाहिण्या सध्या शहरात कार्यरत आहेत. त्यात निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत दोन विद्युत दाहिण्या कार्यरत आहेत. १८ वर्षांपासून विद्यूतदाहिनीची सोय प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून निगडी स्मशान भूमीतील ह्या विद्युत दाहिण्या न थांबता सतत कार्यरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताणामुळे विद्युतदाहिनी मध्येच बंद पडण्याचा प्रकार सध्या घडत आहे(आज १५/०४/२०२१ रोजी ३ तास एक दाहिनी बंद होती) दर आठ तासाला सरासरी १२ मृतदेह निगडी स्मशान भूमीतील दाहिन्यांमध्ये दाखल होत आहेत. गेल्या १५ दिवसात ५०० पेक्षा जास्त मृतदेह अंतविधीसाठी दाखल झाले, दिवस – रात्र मृतदेह जाळल्यामुळे “बिडाच्या चिमणीनेही” (धुरांडे) दम टाकला आहे. त्यातच नुकतीच एक चिमणीही बदलण्यात आली, अ श्या कठीण काळात परगावाहून अंतविधीसाठी आलेल्या लोकांना स्मशान भूमीत मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, तेजस सापरिया, विजय मुनोत व समिती अध्यक्ष विजय पाटील मात्र तत्परता दाखवत माणुसकी जपत आहेत. त्यांना धीर देऊन अंतविधीसाठी मदत करत आहेत.
या प्रसंगी समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” सध्या निगडीमधील ‘अमरधाम’ चे दृश्य अतिशय विदारक आहे, विद्युतदाहिनी मध्ये मृतदेह जाळण्यासाठी अँबुलन्सच्या(रुग्णवाहिकांच्या) रांगा स्मशानभूमीत नजरेस पडत आहत.मृतदेहाला सुद्धा अंतिम विधीची प्रतीक्षा करावी लागत आहे.मृतदेह एक कडेला आणि नातेवाईक दुसऱ्या बाजूला ताटकळत अनेक तास प्रतीक्षा करत आहेत. त्यातच एखादी विद्युतदाहिनी बंद पडते, त्यामुळे प्रतीक्षेत अजून भर, पुढची भयानकता पाहता महापालिकेने तातडीने अजून एक विद्युतदाहिनी उभी करणे अत्यावश्यक आहे. लोकसंख्येच्या गरजेनुसार शहरात १५ विद्युतदाहिन्यांची आवश्यकता आहे.पण सध्या फक्त ७ विद्युतदाहिन्या कार्यरत आहेत.त्यामुळे निगडी आणि पिंपरी या दोनही दाहिन्यांवर मोठा ताण पडत आहे.”


















