- महावितरणचे घोटाळे बाहेर काढले म्हणूनच आकसापोटी कारवाई
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- मराठी उद्योजक संतोष सौंदणकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चहाठ्यावर आणला असून, प्रशासनाचे अनेक दाबलेली प्रकरणे उजेडात आणलेली आहेत. महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे हे भ्रष्टाचारी यंत्रणांना पाठीशी घालीत असून, या भ्रष्टाचारी यंत्रणांचे मूळ हे संजय ताकसांडे आहेत.
ताकसांडे यांनी सूडबुद्धीने शिवसेना नियुक्त विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांचे ‘न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना रद्द केलेला आहे. तो त्वरित सौंदणकर यांना परत करावा, याबाबत तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना निवेदन दिले आहे
यात त्यांनी म्हटले आहे की, ”आपल्या परिमंडलातील भ्रष्टाचार पुराव्यानिशी काढून पाठपुरावा करून, तीन प्रकरणे मा. लोकायुक्त सो., महा. राज्य. मुंबई. येथे दाखल केले आहेत. तसेच आपले प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या नियुक्तीला मा. उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे. याचा राग धरून ताकसांडे यांनी चिडून जाऊन आकसापोटी पुणे परिमंडळाच्या प्रशासनास हाताशी धरून, संतोष सौंदणकर हे मालक असलेल्या न्यू सिमरन इटरप्रायजेस या फर्मचा परवाना रद्द केलेला आहे. या सर्व प्रकरणांवरून महावितरणाचा भ्रष्टाचार सिद्ध होत आहे, त्यामुळे प्रशासनाने केवळ आकसापोटी शिवसेनच्या पक्ष सदस्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवशाही व्यापारी संघटना महा. प्रदेश अध्यक्ष तसेच शिवसेना संपर्क प्रमुख तिरोडा-गोरेगाव विधानसभा या नात्याने गंभीर दखल घेत, आमचे सर्व पदाधिकारी याचा जाहीर निषेध करीत आहेत. तसेच त्यांच्या पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल संघटनेच्यावतीने जाहीर केलेल्या उपोषणास शिवशाही व्यापारी संघाचा व पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठींबा देत आहोत. तरी, आपण आकसापोटी केलेली कारवाई त्वरित रद्द करावी. अन्यथा पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल, याची सर्वस्वी जवाबदारी आपणावर राहील, असा इशाराही दाखले यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.










