न्युज पीसीएमसी नेटवर्क : मुंबई : बऱ्याच दिवसांनी मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा चर्चेत आले असून युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या गाण्यामुळे ते ट्रोल झाले आहेत. महागुरू सचिन पिळगावकर यांना नेटकऱ्यांनी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या नावाने अपलोड करण्यात आलेल्या या गाण्यावरून ट्रोल केले आहे.
१६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीचे असणाऱ्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. सचिन पिळगावकर यांनीच मुंबईतील जीवनशैलीवर आधारित असलेले हे गाणे गायले आहे. पण ते गाण्याची शब्दरचना, संगीत आणि विनोदी प्रकारे चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे. सचिन पिळगावकर यांनी या व्हिडीओमध्ये काम केल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या व्हिडीओखालील कमेन्टसही एकदम मजेदार असून पिळगावकर यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला आहे. मोहम्मद अकील अन्सारी यांनी ‘आमची मुंबई’ अल्बममधील या गाण्याची शब्दरचना केली असून व्हिडीओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे. या व्हिडीओखालील डिस्क्रीप्शननुसार ‘मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हिच वैशिष्ठ्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असं म्हणत या गाण्याचा आस्वाद घ्या असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.


















