न्युज पीसीएमसी नेटवर्क : नवी दिल्ली : आरबीआयने बुधवारी आपला वार्षिक अहवाल सादर केला. यात नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्केच नोटा आरबीआयकडे जमा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षात हिंदुस्थानमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे व महागाई कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कर प्रणालीत जीएसटीने महत्वाची भूमिका बजावल्याचेही आरबीआयने यात म्हटले आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. पण ज्या तत्परतेने जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या त्या तुलनेत नवीन नोटा उपलब्ध करुन देताना सरकारची दमछाक झाली होती.
अहवालातील माहितीनुसार नोटबंदीच्या काळात ५०० व १००० रुपयांच्या १५.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. यापैकी १५.३१ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्याचे म्हटले आहे. पण १३ हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्याच नाहीत. पैसे मोजण्याचे कठिण कार्य पूर्ण झाले आहे. या नोटा हाय स्पीड करन्सी वेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग सिस्टमवरुन (CVPS) केल्याचे आरबीआयने अहवालात म्हटले आहे.













