- लशीअभावी कामगारांच्या लसीकरणासाठी उद्योजक वेटिंगवरच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सध्या लशीचा अपुरा साठा आहे. त्यामुळे उद्योजकांना परवानगी देता येत नसल्याची माहिती महापालिकेच्या देण्यात आली. तसेच ४५ वयोगटाच्या पुढील कामगारांनी पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
राज्य शासनाने कंपन्या सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. कंपन्यामध्ये येणाऱ्या कामगारांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली आहे, तसेच धोका होऊ नये म्हणून कामगार लसीकरण करून घेत आहेत. कामगारांचे कंपनीतच लसीकरण करून घेण्यासाठी उद्योजक पुढाकार घेत आहेत. सर्व यंत्रणा उभारण्याची तयारी ते दर्शवित आहेत. मात्र अपुऱ्या लशीच्या साठ्यामुळे उद्योजकांना परवानगी मिळत नाही.
शहरात सध्या लसीकरणाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. लशीचा अपुरा साठा यामुळे लसीकरणाला वेग येत नाही. अनेक केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या तरी उद्योजकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे माहापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. लसीचा पुरेसा साठा आल्यानंतर विचार करता येईल. तोपर्यंत ४५ वयोगटापुढील कामगारांनी महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले आहे.