- ‘फ’ प्रभाग स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांची आयुक्तांकडे मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- कोरोनामुळे प्रभागाच्या बैठका, मासिक सभा बंद आहेत. त्यामुळे प्रभागातील समस्या मार्गी लागत नाहीत. त्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाची ऑनलाईन बैठक घ्यावी, अशी मागणी ‘फ’ प्रभागाचे स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, थोड्याच दिवसांत पावसाळा सुरू होईल. तत्पूर्वी केली जाणारी नालासफाई, पावसाळी पाणी वाहुन नेणारी नलिका सफाई, रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे, नदीवर असलेली जलपर्णी काढणे ही कामे पूर्ण करु घेणे गरजेचे आहे. पाऊसामध्ये येणाऱ्या अचडणी कमी होतील. त्याचप्रमाणे धुर फवारणी, औषधे फवारणी याचे नियोजन करणे हे ही महत्त्वाचे आहे.
सध्या महानगरपालिकेची आमसभा ही ऑनलाईन पध्दतीने होते. त्यामुळे अनेक समस्या सुटतात. मात्र, प्रभागस्तरीय स्वी. सदस्यांना समस्या मांडण्यासाठी प्रभागाची बैठक हे एकच ठिकाण आहे. प्रभागातील नगरसेवक, स्वी सदस्य, अधिकारी यांच्यात समन्वय होऊन प्रभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाची ऑनलाईन बैठक घेण्यास मंजुरी द्यावी, असे या निवेदनात दिनेश यादव यांनी म्हटले आहे.


















