- दर पंधरा दिवसांच्या चाचणीला कामगारांमधून होतोय विरोध….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- औद्योगिकनगरीतील मोठ्या, मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रात काम करणारा वर्ग आणि कामगारांना प्रत्येक पंधरा दिवसाला कोरोनाची आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे; मात्र त्यासाठी लागणारा वेळ, रांगेत थांबल्यावर दुसऱ्याकडून संक्रमणाची भीती या सर्व बाबीमुळे दर पंधरा दिवसांनंतर कोरोनाच्या चाचणीस कामगार वर्गातून विरोध होऊ लागला आहे.
उद्योग क्षेत्रात विविध भागातून स्टाफ, कामगार येत असतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या भावनेतून संबंधितांच्या कोरोना तपासणी करण्याचा नियम शासनाने पारित केला आहे. त्या अनुषंगाने शहरात सुरू असणारे पन्नास टक्के उद्योगामध्ये कामासाठी येत असणाऱ्या स्टाफ आणि कामगारांना दर पंधरा दिवसाला कोरोना संदर्भात तपासणी अनिवार्य केली आहे. विविध उद्योग क्षेत्राकडून कामगारांचा तपासणी अहवाला मागविण्यात येत आहे. महिन्यातून दोन वेळा त्यासंदर्भातील चाचणीअहवालास महत्व प्राप्त झाले आहे.
उद्योग क्षेत्राकडून आयुक्तांना कंपन्यांमध्येच ही तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच काही खासगी लॅब चालकांना उद्योग क्षेत्रातून याबाबत विचारणा केली होती; मात्र लाखो कामगारांची कोरोनाची चाचणी करण्यासाठी यंत्रणा सक्षम नसल्याने ही मागणी सर्वांकडून धुडकविण्यात आली. मोठ्या कंपन्यातील कामगारांना ने – आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे; परंतु मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रात या सुविधा नसल्याने शहरातील संबंधित केंद्रांवर जात तिथे रांगेत उभे राहुन तपासणी करून घ्यावी लागत आहे. ही तपासणी करताना रांगेत उभे राहावे लागते. त्याठिकाणी संक्रमण होण्याची भीती कामगारांमध्ये आहे. तसेच अहवाल देण्यासही विलंब होत असल्याने कामगारांना विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम कामावरही होत आहे.
उद्योग क्षेत्रात पंधरा दिवसांनी स्टाफ, कामगारांची कोरोना चाचणीचा निर्णय योग्य आहे; परंतु कामगार वर्गातून याला विरोध होत आहे. आम्हालाही आमची काळजी आहे. त्याअनुषंगाने आम्ही खबरदारी घेऊन कंपनी ते घर आणि घर ते कंपनी असाच प्रवास करत असल्याने दर पंधरा दिवसाला तपासणी बंद करा, अशी मागणी वाढू लागली आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष पिं.चिं. लघु उद्योग संघटना…