- भाच्याकडून मामासह आणखी एकाची आर्थिक फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून देण्यासाठी भाच्याने मामाकडून वेळोवेळी रोख व एनईएफटीव्दारे ७० लाख सहा हजार ९८८ रुपये घेतले. मात्र, हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून न देता बनावट चलन व बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली. बनावट पावत्या देऊन त्याने मामाची फसवणूक केली. तसेच मामाच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे, असे भासवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व वाहन सोडवून आणण्यासाठी चार लाख ३३ हजार ७५० रुपये घेतले.
तसेच मोहन शामराव शिंदे (रा. वाघोली) यांना सर्व्हिसचे पैसे मिळवून देण्यासाठी व पेन्शन चालू करून देण्याचे आरोपीने सांगितले. तसेच शिंदे यांचा मुलगा मयूर शिंदे याला कॉलेजमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून त्याने मोहन शिंदे यांचा विश्वास संपादन केला. आणि त्यांच्याकडून १९ लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतरही मोहन शिंदे यांना सर्व्हिसचे पैसे तसेच पेन्शन चालू न करून देता आणि त्यांचा मुलगा मयूर शिंदे याला नोकरी न लावून देता मोहन शिंदे यांची फसवणूक केली.
आरोपी भाच्याने त्याचा मामा फिर्यादी साळुंखे तसेच मोहन शिंदे यांची एकूण ९३ लाख ४० हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली. कृष्णदेव बबन काशिद (रा. लोहगाव,) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. दत्तात्रय नारायण साळुंखे (वय ४६, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे.