- कोविड रुग्णसंख्या घटल्याने नेहरूनगरचे जम्बो रुग्णालय बंद होणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी, पुढील ६ ते ८ महिने सर्व नागरिकांनी काळजी घेणे व आवश्यक नियम पाळणे गरजेचे आहे. तरच, कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. रुग्णसंख्या घटल्याने नेहरूनगरचे जम्बो रुग्णालय लवकरच बंद करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.१९) स्पष्ट केले.
रुग्णसंख्या घटल्याने शहरात तब्बल ६ हजार २०० बेड रिकामे आहेत. त्यातील २ हजार २४६ बेड ऑक्सिजनचे आहेत. तर, ३८ व्हेंटिलेटर्स व आयसीयुतील २९२ बेड आहेत. कोविड केअर सेंटरमधील २ हजार २०० बेड रिक्त आहेत. त्या संदर्भात विचारले असता, आयुक्त बोलत होते.
ते म्हणाले की, लाट ओसरण्याचे संकेत दिलासादायक असले तरी, संसर्गाची लागण कमी होत नाही तोपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अमरावती व नागपूरात रूग्णांची संख्या कमी होऊन पुन्हा वाढली. तशी शक्यता येथे नाकारता येत नाहीत. त्यामुळे पुढील ६ ते ८ महिने सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क वापरणे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे.


















